सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रशासनाचा निषेध व्यक्त केला हे आंदोलन होते ते म्हणजे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या विरोधात.
मागील दोन वर्षात अनेक सर्वसाधारण सभा या ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झाल्या आहेत सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना कोणतेही मुद्दे अथवा प्रश्न मांडता आले नाहीत त्यामुळे प्रशासनाला याचा फायदा होतो आणि प्रशासनाला हवे ते विषय मंजूर होतात त्यामुळे यंदाच्या ऑनलाईन सभेवर सर्व सदस्यांनी बहिष्कार घातला. सभाही खुल्या जागेत ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी सदस्य आक्रमक होते याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे थोडे उशिरा आले काका जिल्हा परिषदेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य, त्यांना सर्व सदस्यांनी आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले तेव्हा ते पायऱ्यांवर जाऊन बसले.
काही वेळातच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी आले होते सर्वच पक्षाचे आंदोलन असल्याने तेही आंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पुढे आणि बरोबर त्यांच्या पाठीमागे भाजपचे जिल्हाध्यक्ष बसले.
राज्यामध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मात्र एकत्र या आंदोलनात एकत्र सहभागी होते हे राजकीय आगळेवेगळे चित्र प्रथमच पहायला मिळाले, तेसुद्धा एकमेकाच्या पुढेमागे हे चित्र टिपण्यासाठी उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकच गर्दी केली होती. त्याचवेळी काँग्रेसचे माजी सभापती मल्लीकर्जून पाटील यांनी भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख यांना उद्देशून “ओ अध्यक्ष महोदय हे सर्वपक्षीय आहे,नाहीतर तुम्ही लगेच भाषणाला सुरुवात करचाल” असा चिमटा घेतला, त्यावेळी सर्व सदस्यांमध्ये एकच हशा पिकला…….


















