राज्यात महाआवास अभियान ग्रामीण भागात सुरू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
राज्यात महाआवास अभियान ग्रामीण भागात सुरू करण्यात आले असून त्या अंतर्गत २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत म्हणजे केवळ १०० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधण्यात येतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले.
सध्या अपूर्ण असलेली घरे पूर्ण करणे आणि नवीन घरे बांधणे या दोन्हींचा अभियानात समावेश असेल. केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरिल निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची योजना यांमधून ग्रामीण नागरीकांना घरे देण्यात येत आहेत.