सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे उप अभियंता रमेश चौगुले यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कार्यकारी अभियंता पंडीत भोसले, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, चौगुले यांचे कुटुंबीय तसेच शाखा अभियंता मधून पदोन्नती झालेले उप अभियंता व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केले. यावेळी दिलीप स्वामी यांच्या हस्ते चौगुले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यापूर्वी दुपारी शांतीसागर मंगल कार्यालय येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांनी रमेश चौगुले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना त्यांच्या जिल्हा परिषदेतील कामाचे कौतुक केले. चौगुले हे सर्व गुण संपन्न असे अभियंता आहेत. त्यांनी आजपर्यंत कुठल्याही कामाला नकार दिला नाही, कुणाशी कधी वाद घातला नाही, त्यांच्या तोंडी नाही हा शब्द कधीच आला नाही अशा चांगल्या अधिकाऱ्याला आता जिल्हा परिषद मुकणार आहे परंतु ते सोलापुरातच असल्याने त्यांचे निश्चितच जिल्हा परिषदेला यापुढे मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना चौगुले यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलेली सेवा आणि अधिकाऱ्यांचे मिळालेले सहकार्य याबद्दल आभार व्यक्त केले.

















