सोलापूर : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय काढून भीमा (उजनी) प्रकल्पाच्या पाणीवाटपाचे फेरनियोजनाचे ताळेबंद ठरवले आहे. उजनी धरणात येणारे प्रवाही क्षेत्र 916.273 होते ते आता कमी करून 870.430 करण्यात आले आहे.
यामध्ये विशेष करून या शासन आदेशात इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला पूर्वी 16.140 दस लक्ष घनमीटर प्रस्तावित होते आता ते वाढवून 25.484 दस लक्ष घनमीटर इतके करण्यात आले आहे.
जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, या नियोजनात उजनी धरणात प्रवाही सिंचनाचे उजनीच्या लाभ क्षेत्रातील 45 दलघमी पाणी कमी करून उजनीच्या वरच्या उपसा सिंचन योजनेला परवानगी देत आहात हा सोलापूर जिल्ह्यातील उजनीच्या लाभधारकांवर अन्याय आहे, उजनीच्या लाभ क्षेत्राने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत, कारण इथल्या शेतकऱ्यांना कोरड्या जमिनीला पाणी मिळावे,
प्रवाही सिंचन रद्द करून वर उचल पाण्याला परवानगी दिल्यास उजनीच्या कॅनॉलला पाणी येणार नाही. मग या सरकारचे धोरण सोलापूर जिल्ह्याचे पाणी कमी करण्याचे आहे का? हे धरण आठमाही आहे, या नावावर उपसा सिंचन योजनेला परवानगी देणार, शेतकऱ्यांना आठमाहीची भीती दाखवून तिथल्या शेतकऱ्यांना बारमाहीच पाणी देणार का? असा सवाल अनिल पाटील यांनी उपस्थित केला.


















