सोलापूर : यंदा एक सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किमान दोन अंकी नगरसेवक निवडून येतील आणि महापौर पदाचा दावेदार बनतील असा विश्वास ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी काल सांयकाळी माकपचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे झालेल्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना व्यक्त केले.
बुधवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय दत्त नगर येथे जिल्हा सचिव मंडळ सदस्य युसूफ शेखमेजर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व साधारण सभा पार पडली.ही सर्व साधारण सभा प्रामुख्याने आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने घेण्यात आली असून याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सनी शेट्टी, सिद्धप्पा कलशेट्टी यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारा निवडणूक कार्यालयचे फॉर्म 6,7,8 व 8 अ ची माहिती सोबत नवीन मतदार नोंदणी,नाव दुरुस्ती, पत्ता बदल याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले.
असंघटीत कामगारांची नोंदणी इ श्रम या पोर्टलवर करण्यासंबंधी माहिती सिटू चे राज्य सचिव सलीम मुल्ला यांनी दिली.
कॉ.आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग पद्धतीवर सध्या संभ्रम आहे निवडणूक आयोगाने एक सदस्य प्रभाग पद्धतीची कच्चा आराखडा तयार करून पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र एक सदस्य प्रभाग झाल्यास किमान दीड हजार तर दोन सदस्य प्रभाग रचना झाल्यास किमान तीन हजार मते विजयासाठी लागतील असे आडम मास्तर यांनी सांगितले, सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सक्षम,अभ्यासू,लढाऊ व शहराच्या विकासाची अंतरीक तळमळ असणाऱ्या व्यक्तींना नगरसेवक म्हणून आपले प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी.अन्यथा विकासा ऐवजी भकास होईल.
महानगरपालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी नसून नागरीक आणि शहर विकासाची राजधानी आहे याचे महत्व व गांभीर्य मतदार बांधवानी लक्षात घ्यावे असे ही ते पुढे म्हणाले.
27 सप्टेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने सार्वत्रिक भारत बंद ची हाक देण्यात आली असून शेतकरी बाबत तीन कृषी काळे कायदे रद्द करा, तीन श्रम संहिता रद्द करा युवकांना नोकरी व रोजगार द्या, ऑनलाइन शिक्षण पद्धती रद्द करा. अशा अनेक न्याय हक्काच्या मागण्या घेऊन होणाऱ्या भारत बंद मध्ये सहभागी व्हा असे आवाहन माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांनी केले.
व्यासपीठावरअँड.एम.एच.शेख, माकपच्या नगरसेविका कॉ.कामीनीताई आडम,सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ मेजर,सलीम मुल्ला,अनिल वासम उपस्थित होते. सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ.अनिल वासम यांनी केले.


















