मोहोळ : मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे शेतामध्ये गांजाची लागवड केलेली ८४ रोपे व सहा किलो वाळलेला गांजा असा १७ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा गांजा मोहोळ पोलिसांनी जप्त केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना पेनूर हद्दीमध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याची खात्री केली. या ठिकाणी परिसरामध्ये शेतामध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता वैजनाथ जाधव यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये चोरून गांजाची रोपे लागण्याची लागवड केली असल्याचे निदर्शनास आले.
या ठिकाणी एकूण ८४ झाडे व अर्धवट वाळलेला सहा किलो गांजा असा एकूण १७ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे, ए एस आय लोबो चव्हाण, युसुफ शेख, समाधान पाटील , पोलीस कॉन्स्टेबल निलेश देशमुख, गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरीश थोरात, वसीम शेख यांनी केली. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे हे करीत आहेत

















