सोलापूर : केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून केंद्र शासनाच्या या धोरणाच्या विरोधात जिल्हा युवा सेना आक्रमक झाली असून सोलापूर जिल्हा युवासेना च्या वतीने मोहोळ येथे बैलगाडी मोर्चा तर जिल्ह्यात सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या महागाई व इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.
केंद्र सरकार कडुन देशभरात दररोज होणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असून त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत असून सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे. सर्व स्तरातील व्यक्तींचे आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडले आहे.
केंद्रातील सरकार लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले. मात्र त्यांनी जनतेला दिलेल्या शब्दांचा पूर्णपणे विसर पडला असून या केंद्र शासनाच्या खोटेपणा च्या विरोधात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या सुचनेनुसार व युवासेना सहसचिव विपुल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅलीचे आयोजन झाले,
मोहोळ येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला व निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमूख शिवसेना नेते दिपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, शिवाजी पासले, सचिन जाधव, गणेश नाईकनवरे संग्राम जगताप आदीसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.

















