सोलापूर : काँग्रेस पक्षाला धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या रुपाने युवा, सर्वपरिचित आणि चर्चेचा चेहरा असलेला जिल्हा अध्यक्ष मिळाला आहे, त्यांनी पदभार घेतल्याच्या आठ दिवसातच सर्व तालुक्याच्या बैठका सुरू केल्या आहेत त्यामध्ये गुरुवारी पहिली बैठक मोहोळ तालुक्याची होती विशेष म्हणजे या बैठकीला तालुकाध्यक्ष अशोक देशमुख यांनी दांडी मारल्याचं दिसून आलं. बैठकीला माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, जिल्हा महिलाध्यक्ष शाहीन शेख, देवानंद गुंड, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष गौरव खरात, राजेश पवार, हनुमंत पाटील, सुरेश शिवपूजे, शहराध्यक्ष पोपट कुंभार, रफिक पाटील, सुलेमान तांबोळी, भीमराव वसेकर, अरुण पाटील,किशोर पवार,बिरा खरात सुरेश हावळे यांच्यासह ग्रामीण भागातून जुने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी आपले मते मांडली, मोहोळ तालुक्यातल्या मालकांची दहशत काहींच्या बोलण्यातून जाणवली तालुकाध्यक्ष अशोक देशमुख यांच्या विरोधात तक्रारी समोर आल्या, देशमुख व्यक्ती म्हणून चांगले आहेत पण त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढण्यास नकार दिला त्यामुळे त्यांचे अपयश दिसून आले अशा भाषेत काही कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष वर नाराजी व्यक्त केली.
मोहोळ तालुक्यात सत्तर वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यालय नाही, 10 बाय 10 ची जागा नाही, मग कार्यकर्त्यांनी बसायचं कुठे? असाही सवाल एका ज्येष्ठ नेत्याने उपस्थित केला. मोहोळ मध्ये आज पर्यंत राष्ट्रवादीचा आमदार निवडून येतो मात्र या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळणाऱ्या 70 टक्के मतदान मध्ये तीस टक्के मतांचा वाटा हा काँग्रेस पक्षाच्या मतांचा असतो मात्र ते आमदाराकडून तो 30 टक्के वाटा काँग्रेस पक्षाला मिळत नाही असे जाणीवपूर्वक मोहोळ तालुक्यात होत आहे म्हणून काँग्रेस पक्ष या तालुक्यात मागे पडला गेला कुणी त्यावर कधीच चिंतन करत नाही, नेते बोलत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस समर्थक शेतकऱ्यांचे ऊस जाग्यावर वाळवणे, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध नासवलं असे थेट आरोप काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केले. शेवटी तालुका अध्यक्ष का आले नाहीत याची माहिती घेतली असता त्यांच्या कुटुंबातील कोणाचे तरी निधन झाले आहे म्हणून ते आले नसल्याचं समजलं.


















