राज्यातले कोरोनासाठीचे निर्बंध 15 मेच्या सकाळपर्यंत कायम राहणार असल्याचं सरकारने जाहीर केलंय.
‘ब्रेक द चेन’ धोरणाअंतर्गत महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले निर्बंध 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कायम राहणार असल्याचं राज्य सरकारने आदेशांमध्ये म्हटलंय.
महाराष्ट्रातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवावा असं कॅबिनेटमधल्या सर्वांचं मत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल बोलून दाखवलं होतं.
देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 15 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या 150 जिल्ह्यांमध्ये, लॉकडाऊन किंवा निर्बंध घालण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केलाय. केंद्र सरकार लवकरच राज्यांसोबत चर्चाकरून याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय.
या जिल्ह्यांमध्ये कोरोनाव्हायरसची चेन ब्रेक करण्यासाठी तात्काळ उपाययोजना गरजेच्या आहेत, असं तज्ज्ञांच मत आहे.
देशात दिवसेंदिवस वाढणारा कोरोनासंसर्ग पाहाता, केंद्र सरकारने 25 एप्रिलला सर्व राज्यांना पत्र लिहून काही सूचना दिल्या. कोरोनावाढीचा दर स्थिर नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात असे आदेश मोदी सरकारने दिले.
· एका आठवड्यात टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असलेले जिल्हे
· उपलब्ध ऑक्सिजन, ICU बेड्समधील 60 टक्के बेड्सवर रुग्ण उपचार घेत असतील तर
· या जिल्ह्यांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट रणनिती आखावी
· लोकांचा एकमेकांशी संपर्क थांबवण्यासाठी 14 दिवसांचा वेळ घ्यावा
· या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांची योग्य अंमलबजावणी होते का हे पहाण्यासाठी नोडल अधिकारी नेमावेत.
· जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी दररोज कंटेनमेंट झोनचा आढावा घ्यावा
· राज्यांनी याचा रिपोर्ट केंद्राकडे पाठवावा



















