सोलापूर : स्वातंत्र्याची 75 वर्षनिमित्त एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प अंतर्गत अनुकंपा नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, आमदार अजयशेठ गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महसूल विभागातील वैभव कट्टे संदीप पवार, फैजान चिस्ती, राकेश वेदपाठक, राणी साबळे, अब्दुल मोईज सय्यद, अभिषेक जमादार, अंकिता साठे, नोंदणी व मुद्रांक विभाग शिल्पा सुरवसे, अंजली रेवजे, सार्वजनिक बांधकाम विभागातील संभाजी खांडके, सिद्धनाथ हाक्के, सचिन शिंदे, सदाशिव पिसे, तानाजी कांबळे, अभिजीत कन्हेरकर, अझहर पठाण व सौरभ जानकर या अठरा जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती पत्र, श्री.विठ्ठल-रूक्मिणी व पुष्प गुच्छ देण्यात आले. नियुक्तीपत्र हातात पडताच लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण 75 हजार नोकऱ्यांची घोषणा केली नुसती घोषणा करून आम्ही थांबलो नाही तर दर कॅबिनेटच्या वेळेस आम्ही नियुक्तीपत्र वाटप करतो. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याला राज्यातून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार सर्वसामान्य गोरगरिबांचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कचेरी मध्ये नागरिकांना दाखले घेण्यासाठी येऊ नये म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून त्यांना लागणारे सर्व दाखले, प्रमाणपत्र त्याच ठिकाणी हातामध्ये दिले जातात. याचा सर्वसामान्य माणसांना फायदा होत आहे.
सांगायला अभिमान वाटतो की जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, सीईओ, बीडिओ हे सर्व गावागावात दिसत आहेत, लोकांच्या नोंदणी करताहेत, लाभार्थ्यांना शोधत आहेत, त्यांची नोंद घेऊन सन्मानपूर्वक स्टेजवर बसवत आहेत, हे आजपर्यंत कधीच घडले नव्हते. केवल शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे साध्य झाले.
आपल्या स्वागत व प्रास्ताविकात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार रोजगार निर्मितीचा शासनाचा मानस लक्षात घेऊन एक जानेवारी 23 पासून आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा सूचीतील गट क व गट संवर्गातील एकूण 59 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याची माहिती दिली.
अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकामी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे, वृषाली केसकर,अजिंक्य गोडगे, परिविक्षाधीन नायब तहसिलदार तुषार शिंदे यांनी काम पाहिले. सर्व नवनियुक्त उमेदवारांना देण्यात आले. अशाप्रकारे कार्यक्रम यशस्वी झाला.





















