कोरोनाच्या काळात सोलापूरचा तिसऱ्यांदा पालकमंत्री बदलला, अजितदादा यांच्या मर्जीतील मात्र सुप्रिया ताईंच्या बारामती मतदारसंघातील दत्तामामा भरणे यांना सोलापूरचे तिसरे पालकमंत्री केले, भरणे मामांनी 2020 साली कोरोना काळात अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली, प्रशासनाकडून चांगले काम करून घेतले, वर्षभरात भरणे मामांच्या कामाचे कौतुक सर्वांनीच केले. गोड बोलून बोलून त्यांनी सोलापूरची परिस्थिती हाताळली, माध्यमांमधील आपल्या भाच्याना एक मिनिटं ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना, असे म्हणत शांत ठेवले, शेवटी मामा किती दिवस गोड बोलणार तेसुद्धा आता चांगलेच टार्गेट झाले आहेत.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी इंदापूरच्या सिंचन योजनेला तब्बल 500 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आहे तशीच तरतूद मंगळवेढ्याच्या 35 गावच्या पाणीपुरवठयासाठी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच पीएमसी पाणी घेतले जाणार असल्याचा विषय समोर आला तिथूनच इंदापूरचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे ते राजकीय लक्ष झाले.
दत्तामामांना उजनीतून पाणी देण्यास सोलापूरकरांमधून तीव्र असा विरोध झाला मात्र पालकमंत्री भरणे यांनी सोलापूरचे नियोजित एक थेंबही पाणी मी इंदापूरला नेणार नाही असे ठासून सांगतानाच सर्वानाच अंगावर घेतले, हे सर्व होत असतानाच इंदापूर तालुक्यातील दत्तामामाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली, “ये तो अभी ट्रेलर है आगे आगे देखो होता है क्या” अशाने मामांवर सोलापूरकरांचा संताप अधिकच वाढला, उजनीत येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टीएमसी पाणी प्रक्रिया करून इंदापूरला देणार असल्याचा आदेश निघाला त्यानंतर मात्र सर्वच राजकीय पक्ष दत्तामामांवर तोंडसुख घेऊ लागली, शिवसेना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सरसावली, प्राण जाये पर पाणी ना जाये अशी भूमिका काँग्रेसने घेतली, भाजपने तर नामदेव पायरीवर आंदोलन करण्याचा इशारा दिला, जनतेचा संताप पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही विरोध करावा लागला.
शेवटी दुसऱ्या मामांनी (आमदार संजय शिंदे) या विषयात लक्ष घालत हा विषय थेट ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत नेला आणि पाणी देण्याच्या आदेशाला स्थगिती आणली, यामुळे तर भरणेमामा यांची चांगलीच राजकीय अडचण झाल्याचे चित्र आहे, पत्रकारांसमोर बोलतानाही त्यांचे तोंड पडले होते, एक मिनिटं, ऐका ना,ऐका ना,ऐका ना,असे म्हणून ही कुणी सध्या त्यांचे ऐकत नाही.अशी उजनीच्या पाण्यावरून राजकिय कोंडी भरणे मामांची झाली आहे.




















