सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून नवा वाद समोर आला आहे, जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या बैठकीमध्ये आमदार खासदार पालकमंत्री यांना निधी देण्याच्या टक्केवारीला अनेकांनी विरोध केला. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सर्व पदाधिकारी तसेच काही ठराविक सदस्यांसोबत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप बाबत बैठक लावली होती. या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीमधून मिळणाऱ्या निधीमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यांना 70 टक्के आणि उर्वरित 30 टक्के निधी पालकमंत्री आमदार यांच्या साठी ठेवावा अशी एकमुखी मागणी समोर आली.
सध्या जिल्हा परिषदेला येणाऱ्या निधीमधून 60 टक्के जिल्हा परिषद सदस्य आणि 40 टक्के आमदार पालकमंत्री असा वाटा आहे मात्र 40 टक्के निधी आमदारांना का द्यायचा असा विरोध काही ठराविक सदस्य करत आहेत. ज्या सदस्यांचा आमदार त्या तालुक्यांमध्ये नाही असे सांगोलाचे एडवोकेट सचिन देशमुख मंगळवेढ्याचे नितीन नकाते अक्कलकोट तालुक्यातील आनंद तानवडे मोहोळ मधील सभापती विजयराज डोंगरे यांचा विरोध दिसून येतो मात्र ज्या तालुक्याचा आमदार आहे आणि त्या त्या आमदारांचे सदस्य जिल्हा परिषदेत आहेत असे ठराविक सदस्य सुध्दा विरोध करतात परंतु समोर येऊन बोलण्याचे धाडस करत नाहीत.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना पत्रकारांनी जिल्हा परिषदेच्या निधी वाटपावरून विचारले असता आमदार, जिल्हा परिषद सदस्य असा दुजाभाव नको. समसमान निधी देण्यावर भर असावा जरी निधी आमदाराच्या माध्यमातून गेला तरी त्या त्या तालुक्यातील गावांमध्ये जाणार आहे. 70 टक्के -30 टक्के असा वाटा करण्याची गरज नाही असे सांगून जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या मागणीला महत्त्व दिले नाही.



















