सोलापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत महिला खासदारांना उद्देशून केलेल्या असभ्य वर्तना प्रकरणी राहुल गांधी यांनी देशातील समस्त महिलांची आणि देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने गुरुवारी केली. शिवसेना महिला आघाडीतर्फे गुरूवारी झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ राहुल गांधींच्या निषेधार्थ आंदोलन केले. राहुल गांधींना बांगड्यांचा आहेर पाठवण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, काँग्रेसचे नेते राहुल गांधी वारंवार भारतमातेचा उल्लेख करतात. परंतु त्यांच्यावर भारतमातेऐवजी इटलीमातेचे संस्कार झालेले आहेत असे या घटनेवरून दिसत आहे. राहुल गांधी यांनी केवळ संसदेतील महिला खासदारांचा नव्हे तर जिजाऊ मांसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह देशातील समस्त महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी महिला वर्गाची आणि देशवासीयांची माफी मागावी. त्यांना शिवसेना महिला आघाडीतर्फे बांगड्यांचा आहेर पाठवणार आहोत. राहुल गांधींनी देशाची माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असेही शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘महिलाओंके सन्मान में’, शिवसेना मैदान में’, ‘मां का लाडला बिगड गया’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रवीना राठोड, शहर प्रमुख जयश्री पवार, मागासवर्गीय आघाडी महिला शहर प्रमुख माधुरी कांबळे, उपशहर प्रमुख पूजा चव्हाण, शहर संघटक अश्विनी भोसले, जिल्हा सचिव संगीता खंबसकर, प्रतिभा एकमल्ले, अंजना चव्हाण, शायरा शेख, सारिका म्हमाणे, काजल जाधव आदी उपस्थित होते.