सोलापूर : शिवसेना सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले माजी महापौर महेश कोठे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना जोरदार आव्हान दिले होते, तुमच्या मुलाला आमच्या विरोधात उभा करून दाखवाच हरलो तर राजकारण सोडले या शब्दात त्यांनी देशमुखांना लक्ष केले. यावर आता आमदार विजयकुमार देशमुख हे काय उत्तर देणार याकडे संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागले होते शनिवारी आमदार देशमुख हे शहर मध्य मतदार संघातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते यावेळी त्यांना महेश कोठे यांच्या आव्हानाबाबत विचारले असता ते म्हणाले,
माझ्या अगोदर पासून महेश कोठे राजकारणात आहेत, तीन वेळा त्यांनी आमदारकी हरली, मात्र जनतेच्या मनातील ते ओळखू शकले नाहीत, त्यासाठी त्यांना सातत्याने तीन वेळा पक्ष बदलावा लागला, पक्ष बदलल्यामुळे लोकांचा विश्वास आपल्यावर येत नाही,विश्वास संपादन करण्यासाठी लोकांची कामं करावी लागतात.केवळ पक्ष बदललो आणि पक्षाचं नेतृत्व माझ्या हातात आलं म्हणजे मी काहीतरी वेगळं करतोय असे होऊ शकत नाही.
आता ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहेत मात्र त्या पक्षासाठी त्यांना उमेदवार शोधावा लागतोय, दोन पक्षाच्या कुबड्या घेऊन मी काहीतरी करतोय हे त्यांचा चुकीचा समज आहे, लोकांचा विश्वास केवळ भाजपवर आहे, भाजपने लोकांचा विश्वास संपादन केलाय, म्हणूनच सत्ता दिली ती पुढे देतील या शब्दात देशमुख यांनी कोठेंना टोला लगावला.

















