सोलापूर : सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरील विमानसेवेला अडसर ठरणारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर गुरुवार 15 जून 2023 रोजी जमीन दोस्त करण्यात आली.
महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले व पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने हे दोन प्रमुख अधिकारी चिमणी पडेपर्यंत सिद्धेश्वर कारखान्याच्या परिसरात ठाण मांडून होते. अनेक दिवसांपासून चिमणी पाडण्याचा विषय सुरू होता परंतु महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनीच करून दाखवले. “एक नारी पडली कारखान्यावर भारी” अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
अनेक दिवसांपासून सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी पाडण्याची मागणी होत होती. सोलापूर विकास मंचने अनेक दिवस यासाठी उपोषण केले होते. सोलापूरच्या विमानसेवेला प्रमुख अडसर ही चिमणी होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून चिमणी पाडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली.
पोलिसांनी दिनांक 13 जून ते दिनांक 18 जून या दरम्यान कारखान्याच्या दोन किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली होती त्यामुळे कोणालाही या परिसरात जाता आले नाही. आंदोलनकर्ते शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच काही राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले. बुधवार 14 जून रोजी सुरू झालेली प्रक्रिया गुरुवार 15 जून दुपारी चार वाजेपर्यंत सुरू होती चारच्या दरम्यान चिमणी अखेर पाडण्यात आली. चिमणी पाडतानाचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत त्यातच आता ड्रोन चित्रणही समोर आले आहे.



















