सध्या कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने जनजीवन उध्वस्त झाले आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना आजाराचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश केला आहे. या योजने अंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे. मात्र शासकीय रुग्णालय वगळता अन्य कोणत्याही रुग्णालयात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णालये जाणीवपूर्वक रुग्णांना योजनेपासून वंचित ठेऊन भरमसाठ बिल आकारणी करत आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यू दर जास्त आहे. वेळेत रुग्ण उपचारासाठी दाखल होत नसल्यामुळे आजार बळावून मृत्यू होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र रुग्णालयांच्या भरमसाठ बिलाच्या भितीने रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यास कचरत आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे उपचारास उशीर झाल्याने देखील रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. मागील एक वर्षापासून सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली आहे. कित्येक कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्य या आजाराने बाधित झाले आहेत. अशी कुटुंबे मोठया रक्कमेची बिले भरुन उपचार करुन घेण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अनेकांना मोफत उपचार मिळून प्राण वाचण्यास मदत होणार आहे. या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना संभाजी आरमारने मागणी आहे की, रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणेकरिता ठोस उपाययोजना कराव्यात. जे रुग्णालय ही योजना अंमलात आणण्यास टाळाटाळ करत असतील अशांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अशा संकट काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करुन प्रशासनावरील ताण वाढविण्याची संघटनेची बिलकुल इच्छा नाही. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे सर्व पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळेल आणि कोणीही पैशाअभावी उपचारापासून वंचित राहणार नाही इतकीच माफक अपेक्षा.
यावेळी संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे,कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे,जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे,विध्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के,कार्यालय प्रमुख सुधाकर करणकोट,राजू रच्छा, व्यंकटेश मद्राल उपस्थित होते.



















