पंढरपूर, दि. 07 (उ. मा. का.) : आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ह्या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत सुमारे 20 लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ह्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
आषाढी यात्रा कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे ठिकाणं निश्चित करुन महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, भाविकांची आरोग्य तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी भाविकांना सकस आहारही दिला जाणार आहे. त्याचबरोबर नदी पात्र, 65 एकर, पत्राशेड व ज्या ठिकाणी मठ, धर्मशाळा यांची संख्या जास्त आहे व वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात थांबतात, अशा ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा देण्याकरिता तात्पुरते दवाखाने सज्ज ठेवावेत. ऑक्सिजन, रक्तसाठा, औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
डॉ. तानाजी सावंत म्हणाले, पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या संख्येने वारकरी भाविक चालत येतात. सद्यस्थितीत उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा करावा. यासाठी टँकरची संख्या वाढवावी. उष्माघाताच्या आजाराबाबत उपाययोजना करावी. आरोग्य सुविधांसाठी वापरण्यात येणारे साहित्य, तपासणी मशीन सुस्थित असाव्यात. भाविकांना पालखी मार्गावर वेळेत उपचार मिळावेत, यासाठी फिरत्या दवाखान्याचे नियोजन करावे. वारी कालावधीत सर्व खाद्यपदार्थांच्या हॉटेलची वेळोवेळी तपासणी करावी. उपलब्ध आरोग्य सुविधांचे फलक लावावेत. तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती करावी. महावितरण विभागाने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा करावा. आवश्यक ठिकाणी जादा रोहित्र बसवावेत. तसेच वारी कालावधीत भाविकांच्या सुरक्षा, आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी पालखी मुक्काम, मार्ग तसेच पंढरपूर शहरात वारी कालावधीत वारकरी, भाविकांच्या सुविधेसाठी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांत माहिती दिली.
वाखरी पालखी तळ, 65 एकरची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी
दरम्यान, आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी, भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमिवर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पालखी तळची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच 65 एकरमध्ये मोठ्या प्रमाणात दिंड्या उतरतात. दिंड्यासोबत वारकरी, भाविक मोठ्या संख्येने असतात. या ठिकाणीही देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेवून आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, मुख्यधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर उपस्थित होते.




















