उजनी धरणातून इंदापूर च्या सिंचन योजनेला पाणी देणे आदेश रद्द झाल्यापासून पालकमंत्री दत्तामामा भरणे हिरमुसले होते, सोलापूर करांचा रोष पाहून ते बरेच नाराज पण झाले, त्यांनी स्वतःहून इंदापूरकरांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याची भाषा बोलून दाखवली होती ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यामुळे मागील तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार अशी चर्चा वार्यासारखी पसरली होती, प्रत्येक जण पालकमंत्री बदलणार का हेच विचारत होते, पुन्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील किंवा जितेंद्र आव्हाड हे पालकमंत्री होतील अशी पण चर्चा ऐकण्यास मिळाली, सोलापूर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी भरणे मामांची तक्रार मोठ्या साहेबांकडे केली होती, त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी सोलापूर जिल्ह्यातील तक्रारींवर बैठक घेतली, त्यानंतर खरेच पालकमंत्री बदलणार का असे बोलले जात होते,मात्र सोलापूर जिल्ह्याला द्यायचं कुणाला असा ही प्रश्न होता, भरणे मामांची पक्षाने नाराजी दूर करत पुन्हा त्यांच्याच खांद्यावर सोलापूर जिल्हयाचा भार सोपवण्यात आला आहे. 6 जून शिवस्वराज्य दिनाला दांडी मारल्यानंतर आता पालकमंत्री भरणे यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम आला असून ते शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. जरी पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुनश्च विश्वास दाखवला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची त्यांच्यावर तीव्र नाराजी कायम आहे.