सोलापूरच्या राजकारणात सध्या “मामा” हा शब्द फारच चर्चेचा विषय झाला आहे, मग ते आमदार संजयमामा असो, की पालकमंत्री भरणेमामा….! जिल्ह्यात मामागिरी प्रचलित झाली आहे. आता पुन्हा एका नव्या “मामा” ची भर पडलीय. ते मामा म्हणजे आपले बंडगर मामा. बाळासाहेब बंडगर हे सर्वत्र बंडगर मामा म्हणून ओळखले जातात. पूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे असलेले बंडगर मामा सध्या बारामती मध्ये वास्तव्यास आहेत. आता त्यांचे भरणेमामा सोबत बरंच जुळू लागलं आहे, दादांच्या मतदारसंघातले मामा आणि समाजबांधव म्हंटल्यावर सूर चांगलेच जुळून आले. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाला बंडगर मामांनी मोठ्या मोठ्या जाहिरात देऊन लक्ष वेधले होते.
पालकमंत्री दत्तामामा शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले, या दौऱ्यात बाळासाहेब बंडगर यांचा पुढाकार दिसला, ते सकाळी होटगी पासून दौऱ्यात होते, पुढे कंदलगाव, लवंगी तसेच हत्तूर या गावभेट दौऱ्यात होते. त्यानंतर सोलापूरात नियोजन भवनात झालेल्या डीपीसीच्या आढावा बैठकीला उपस्थित राहिले. भरणे मामांनी बंडगर मामांना जिल्हा नियोजन समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून घेतल्याची माहिती आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजाची मते पाहता बाळासाहेब बंडगर हे विधानसभेसाठी आतापासूनच तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. बारामती तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्याने अजितदादा यांच्या निवडणुकीत बंडगर मामा महत्वाची भूमिका बजावतात अशी माहिती आहे, मात्र मामा स्थानिक सोलापूरचे असल्याने त्यांना इथेच बक्षीस म्हणून दादांच्या शिफारसीने डीपीसी सदस्य पद मिळाल्याची माहिती आहे,
होटगी गावातील इंद्रजीत लांडगे हा धनगर समाजातील युवा कार्यकर्ता बंडगर मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे बोलले जाते, पूर्वी भाजप तालुकाध्यक्ष चिवडशेट्टी सावकार यांचा कार्यकर्ता असलेला इंद्रजीत याने विरोधात जाऊन बंड केले ,ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि जिंकली पण आहे.