सोलापूर : बार्शी शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बी.आय. टी. कॉलेजजवळ टाकलेल्या छाप्यात एकवीस किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात एका महिलेसह दोघांना पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्या ताब्यातून ०१.३३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उभयतांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ०३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याबाबत बार्शी शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ३१ ऑक्टोबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. विशाल हिरे यांना लेखी रिपोर्टद्वारे व फोनद्वारे कळविले. त्यांनी लेखी परवानगी देऊन टिम नेमून कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने लागलीच सपोनि डी.डी. उदार यांची नेमणूक करुन त्यांना टिमसह व पंचासह रवाना केले.
ही टिम ही ताडसौंदणे रोडने बी.आय.टी. कॉलेजच्या अलिकडे असलेल्या कॅनलजवळ अंधारामध्ये एक स्कूटीजवळ एक इसम व एक महिला उभे असलेले दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने, त्यांचे गाडीचा आर.टी.ओ. क्रमांक पाहीला असता, तो बातमीप्रमाणे खरा (होंडा कंपनीची अॅक्टीव्हा, क्रमांक एम.एच. १३ डी.पी. ५३८६) असल्याची खात्री झाल्याने त्यांना जागीच ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे तानाजी दिलीप माने (वय ३२, रा.तुळजा भवानी कारखाना, नळदुर्ग ता.तुळजापूर) व महीला नामे २ ) दुर्गा दिपक हाजगुडे (वय ३०, रा.नाळे प्लॉट, बार्शी) अशी असल्याचे सांगितले.
त्यांचे स्कुटीवर दोन नायलॉन गोण्या मिळून आल्या. त्यासंबंधी त्यांच्याकडे, विचारणा केली असता, त्यांनी त्यामध्ये गांजा असल्याचे सांगितले. त्यांचेजवळ ९५ हजार ४०० रुपये किंमतीचा २१ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. यासंबंधी सपोनि डी.डी. उदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. उभयतांना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना ३ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि आर. आर. शेळके, सपोनि डी.डी. उदार, सपोफौ वरपे, पोहेकॉ/माळी, भोंग, वाघमोडे, पोना पवार, ठेंगल, पोका घोंगडे, बारगिर, लगदिवे, गोसावी, खाडे महिला पोलीस अंमलदार देशमुख, कोतवाल, पारधी, साबळे, चापोका बशीर मुलाणी, घुले यांनी पार पाडली.

















