सोलापूर : सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा होणार की नाही याकडे संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यातील भाविकांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) हे ओमीक्रोन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेणार याची ही उत्सुकता आहे.
राज्य सरकारने सोलापूर शहरासाठी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना कोरोनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार दिले आहेत. म्हणून आयुक्त सिद्धेश्वर यात्रेचा निर्णय घेतील अशी शक्यता होती मात्र जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख असल्याने शेवटी त्यांच्याकडे बुधवारी प्रशासनाची सामूहिक बैठक झाली.
या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्यासह महापालिका तसेच पोलीस प्रशासनातील इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सिद्धेश्वर यात्रा निश्चित होणार मात्र होम मैदानावर कोणतेही मनोरंजनाची साधने लावण्यात येणार नाहीत, सर्व धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यात येणार असून , सिद्धेश्वर यात्रेतील सर्वात महत्वाचा धार्मिक विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला गर्दी होते, ती गर्दी कशी कमी होईल त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला दिल्यात.

















