सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यापुढे शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोना निर्बंध यामध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी केली होती शहरातील दुकाने दुपारी चार ऐवजी रात्री सात पर्यंत सुरू करा अशी मागणी केली होती त्यावर पालकमंत्र्यांनी त्वरित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी बोलून शिथिलता देण्याबाबत विनंती करणार असल्याचं सांगितलं होतं.
मात्र महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी आदेश काढले त्यामध्ये सोलापूर हे कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातच आहे त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आहे तीच परिस्थिती कायम राहणार असल्याचं त्यांनी या आदेशात म्हटले आहे.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना…
ज्याअर्थी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार दिनांक १४ मार्च २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर अधिसूचनेनुसार साथ रोग अधिनियमाच्या खंड २ (१) नुसार महानगरपालिका आयुक्त यांना नियमांची अंमलबजावणी करणेकामी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.
.मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांच्या संदर्भ क्र.२७ यास अनुसरुन कोविड-१९ चे विषाणू डेल्टा प्लस या व्हेरिएंट मध्ये करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात लेव्हल-३ चे निर्बंध लागू करणेचे निर्देश प्राप्त झालेले आहे.
त्याअर्थी, मी, पि शिवशंकर, भा.प्र.से. आयुक्त सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व देण्यात आलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत सोलापूर शहरासाठी यापूर्वी दिनांक २७/०६/२०२१ रोजीचे आदेश व दिनांक २८/०६/२०२१ रोजीच्या शुध्दीपत्रकातील आदेशच दि. ०९/०८/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करीत आहे. शहरातील पेट्रोल पंपांना अत्यावश्यक सेवेसाठी, कोव्हिड-१९ चे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सेवा देणेस मुभा राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सा नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी.





















