प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्यातील 15 विधानसभा आणि दोन लोकसभा जागा लढवणार असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली. या 15 विधानसभा जागांमध्ये सोलापूर दक्षिण आणि करमाळा हे दोन विधानसभा प्रहार लढवणार असल्याचा निर्णय चौधरी यांनी जाहीर केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या शिवसेना गटाने आपल्याला सोबत घेतले तर त्यांच्याशी युती होईल अन्यथा आम्ही स्वतंत्र ही निवडणूक लढवू असे देखील अनिल चौधरी म्हणाले.
यावेळी चौधरी बोलताना म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यातील 15 विधानसभा आणि दोन लोकसभा मतदार संघ लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ही स्वबळावर आणि तितक्याच ताकदीने लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



















