सोलापूर : शिवसेना शिंदे गटाचे कोकणातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे सोमवारी सोलापुरात आले होते त्यांनी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हा परिषदेमध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या काही संघटनांसोबत बैठक घेतली.
दुपारी एकच्या दरम्यान ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेत असल्याची माहिती मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांना जेव्हा मिळाली. तेव्हा सुमारे 100 मराठा समाजाचे आंदोलनकर्ते जिल्हा परिषदेमध्ये घोषणा देत आले. ज्या ठिकाणी आमदार म्हात्रे यांची बैठक चालू होती त्या त्या कार्यालयात घुसले, मराठा बांधवांचा रोष पाहून म्हात्रे हे त्वरित बाहेर आले. त्यांनी आंदोलकांना बैठक घेण्यामागील कारण सांगण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. “तुम्ही आलात कशाला” असा जाब विचारून त्यांना जिल्हा परिषदेमधून बाहेर काढले. यावेळी राजन जाधव, विनोद भोसले गणेश डोंगरे, ज्ञानेश्वर सपाटे, गणेश देशमुख, हे अतिशय आक्रमक दिसून आले. शेवटी मराठा बांधवांचा रोष आणि आक्रमकता पाहून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर पडणे पसंत केले.