सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडणारे राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी समर्थन दिले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा जाहिरात दिली. तसेच मुंबई येथे पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्या जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हकालपट्टी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र काढून त्या पत्रामध्ये लिहिले आहे की,
आपण दि. २ जुलै, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/ मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलात. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. आपली कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत आहे.
त्यानुसार आपणास दि. २ जुलै, २०१३ पासून पक्षाच्या सदस्यत्वावरुन व सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच आपणास सूचित करण्यात येत आहे की यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.


















