सोलापूर : पंढरपूरच्या राजकारणाला वेगळे वळण देणारी राजकीय घटना समोर आली आहे. मंगळवेढा पंढरपूरचे तीन वेळा आमदार राहिलेले दिवंगत नेते भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी आपल्या सहकुटुंब तेलंगणाचे मुख्यमंत्री बी आर एस पक्षाचे नेते केसीआर यांची हैदराबाद येथे जाऊन भेट घेतली आहे. त्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
केसीआर यांनी भालके कुटुंबासाठी स्पेशल विमान सोलापूरला पाठवले होते मात्र ते सोलापूरच्या विमानतळावर उतरू न शिकल्याने त्यांना पुणे येथे जाऊन या विमानातून हैदराबादला जावे लागले. या भेटीनंतर आता भगीरथ भालके यांचा बीआरएस या पक्षात प्रवेश नक्की मानला जात आहे.
2021 च्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत ही भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असलेली डावलणुक पाहता भालके हे काही दिवसांपासून नाराज होते. दरम्यानच्या काळात त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली होती.
बीआरएस हा पक्ष आता संपूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात उतरला आहे आगामी विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बीआरएसचे ज्येष्ठ नेते शंकर धोंडगे यांची भालके यांनी भेट घेतली होती. भगीरथ भालके यांच्या रूपात बी आर एस पक्षाला पंढरपूर भागात चांगले नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. त्यांचा अधिकृत प्रवेश आता कधी होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.




















