सोलापूर जिल्हा परिषदेमधील समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकारी बसवेश्वर स्वामी आणि सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासनाधिकारी सुहास चेळेकर या दोन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकारी व अनुसूचित जाती वस्त्या सुधार योजनेचा टेबल असलेल्या बसवेश्वर स्वामी यांना सोमवार आठ नोव्हेंबर रोजी तीस हजाराची लाच घेताना समाजकल्याण सभापती यांच्या केबिनमध्ये रंगेहात पकडण्यात आले होते. मोहोळ तालुक्यातील एका सरपंचाने ही तक्रार केली होती.
त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासनाधिकारी सुहास चेळेकर यांना 25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या पथकाने दुपारी बाराच्या सुमारास येऊन अटक केली होती एका मुख्याध्यापकाकडे पडस्थापनेचा प्रस्ताव पाठविण्यासाठी चेळेकर यांनी लाच मागितल्याप्रकरणी तक्रार केली होती या दोन्ही कारवायांमुळे जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या वर्षपूर्ती च्या पार्श्वभूमीवर या कारवाया झाल्याने प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये उत्साह नव्हता. दरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर एन पांढरे यांनी रक्कम रुपये पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली.
दोन्ही आरोपीतर्फे ॲड निलेश जोशी, ॲड मल्लिनाथ बिराजदार, ॲड पैगंबर सय्यद, ॲड राणी गाजुल तर फिर्यादी तर्फे ॲड माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले.


















