सोलापूर : सोलापूर अक्कलकोट रोड वरील कुंभारी नजीक प्रवासी वाहतूक जीप पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात अक्कलकोट तालुक्यातील तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे तर इतर आठ जण सिव्हील हॉस्पिटल, कुंभारीचे अश्विनी हॉस्पिटल व मार्कंडेय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
शहरातील अश्विनी रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या 28 वर्षीय युवकाचा दुपारी साडेचारच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण अक्कलकोट तालुक्यावर शोककळा पसरली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रात्री सातच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तीन जखमींना भेट दिली, विचारपूस केली त्यांच्या नातेवाइकांकडून अपघाताची माहिती घेतली. यावेळी डॉक्टर अग्रजा चिटणीस, डॉक्टर जयकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ रोहित खैराटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, आमदार कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेचे गटनेते अण्णाराव बाराचारे हे उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर तसेच जखमींचे नातेवाईक आणि कल्याण शेट्टी व बाराचारे यांच्याकडून या अपघाताची सविस्तर माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने तहसीलदारांकडून अहवाल मागवणार असल्याचे सांगितले. यावेळी बाराचारे यांनी मृताच्या नातेवाईकांना शासकीय मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत देण्यासाठी अहवाल पाठविण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अक्कलकोट सोलापूर मार्गावर चालणाऱ्या सर्व प्रवासी वाहतूक जीपची चौकशी करावी अशीही मागणी यावेळी जिल्हाधिकार्यांना समोर करण्यात आली आहे.

















