सोलापूरचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे सोलापुर दौऱ्यावर आल्यावर कधी काय बोलून जातील हे कोणालाही पत्ता लागणार नाही. उजनी धरणातून इंदापूरला पाणी नेण्यावरून मामा सोलापूरकरांचे चांगलेच टार्गेट झाले, आपल्या मतदार संघात पाणी नेता न आल्याने त्यांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री पद सोडण्याची भाषा केली होती.
मात्र मामा धनगर समाजाचे नेते. सोलापुरातील धनगर समाज बांधवांमधून त्यावेळी भरणे मामांच्या बाजूने एकजूट दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसला एवढ्या मोठ्या धनगर समाजाला दुखावणे परवडणारे नव्हते. शेवटी भरणे मामा यांनाच पालकमंत्री पदी कायम ठेवण्यात आले. शुक्रवारी भरणे मामा हे सोलापूर दौऱ्यावर होते आढावा बैठक झाली, पत्रकार परिषद झाली,
याचवेळी डॉक्टर गोडसे यांचा सत्कार करण्याची विनंती कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केली. सत्कार करताना फोटो काढता वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे हे बाजुला थांबले होते मामांची नजर त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी “या की दादा जवळ, आमच्या पक्षात या, पक्षात करा काय तर” असे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या दादांना थेट राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्याची ऑफर देऊन टाकली. पहा हा व्हिडीओ
सोलापूर महानगरपालिकेतील 107 नगरसेवकांपैकी आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांशी भांडून आपल्या प्रभागातील, आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्याची कसब नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यात आहे. पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या दौऱ्यामध्ये ते कायम जवळ असतात त्यांच्याकडून निधी कसा काढून घ्यायचा यामध्ये ते पटाईत आहेत, आनंद चंदनशिवे यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला पालकमंत्री मामा हे आवर्जून जातात या दोन नेत्यांची ट्युनिंग सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच जुळल्याच चित्र आहे. आता पालकमंत्र्यांनी थेट राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात हा निश्चितच चर्चेचा विषय ठरणार आहे.


















