“सर्व स्तरावरील १००% कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी, अतिरिक्त बेडसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी. परिसेविका / अधिसेविका/पाठ्यनिर्देशाका पदांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत, राज्यातील परिचारीका संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता (नर्सिंग अलाउन्स) देण्यात यावा, कोविड काळात ७ दिवस कर्तव्यकाल व ३ दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी,”
आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे, सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नव्या बी ब्लॉक समोर सर्व परिचारिकांनी एकत्र येऊन सकाळी 8 ते 10 या वेळेत काम बंद आंदोलन करण्यात आले, यावेळी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी विविध कर्मचारी संघटनेतील शंतनू गायकवाड, राजेंद्र सोनकांबळे, अशोक इंदापुरे, देविदास शिंदे, शंकर जाधव या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन आपला पाठिंबा जाहीर केला, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने 23 ते 24 दोन दिवस काम बंद आंदोलन,25 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य संघटनेच्या अध्यक्षा मनीषा शिंदे , संध्या गावडे, आशा वाले, आशा वाघमोडे, सुधा मंगरुळकर, या पदाधिकाऱ्यांसह शेकडोंच्या संख्येने परिचारिका यात सहभागी झाल्या होत्या दरम्यान मनीषा शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मागण्यांची माहिती देत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला..



















