सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या सोलापूर शहराच्या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्यापासून अनेक पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या जवळ आले शुक्रवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकर्ता मेळाव्यात महेश कोठे यांनी अक्षरशा काँग्रेस फोडल्याचे दिसून आलं.
ज्येष्ठ नेते, काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचे बॉस समजले जाणारे सुधीर खरटमल व माजी महापौर नलिनी चंदेले यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले नगरसेवक तौफिक शेख यांनी अधिकृत प्रवेश केला नसला तरी त्यांनी राष्ट्रवादीच्या स्टेजवर जोरदार भाषण ठोकून आगामी महापालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याची भाषा केली, अपक्ष नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली मात्र ते स्टेजवर सुद्धा दिसून आले नाहीत याची सर्वत्र चर्चा होती.
महेश कोठे यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासाचे अनेक मुद्दे पवार यांच्यासमोर मांडले त्यामध्ये युवकांना रोजगार मिळावा यासाठी आयटी पार्कची आवर्जून मागणी केली, यंत्रमाग उद्योग, विडी उद्योगांना चालना, शहराचा विकास यासह उड्डाणपुला ऐवजी बायपास रस्ता करणे, पाणी प्रश्न, विमानतळाचा प्रश्न त्यांनी पवारांसमोर उपस्थित केला.
शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील कर्ण अशी उपमा महेश कोठे यांनी दिली कर्ण हा दानशूर होता तसेच शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दानशूर कर्ण आहेत अशा शब्दात त्यांनी पवार यांचा गौरव केला. आम्ही सध्या राष्ट्रवादीमध्ये नव्या सुना सारखे आहोत मात्र यापुढे आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला सुना प्रमाणे वागणूक न देता स्वतःच्या मुली प्रमाणे वागणूक द्या अशी मागणी कोठे यांनी पवारांपुढे केली.
पालकमंत्री भरणे म्हणाले, अण्णा मी तुमचा पालकमंत्री मी आहे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मी असल्याने बायपासचे टेंडर झाले आहे, त्याच्या कामाचे उद्घाटन लवकरच होईल, समांतर जलवाहिनी लवकरच येणाऱ्या काळात पूर्ण केलं जाईल त्यामुळे प्रत्येक घरात दररोज पाणी मिळेल, चांगले रस्ते पहायला मिळतील त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत रहा असे आवाहन केले.
कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत परिवर्तन होईल, साहेबांचा आदेश आम्ही शिरसंधान मानू, शहरात सध्या सर्व समाजातील कार्यकर्ते आहेत, महेश कोठे, तौफिक शेख, दिलीप माने यांच्यामुळे पक्ष मजबूत झाला आहे निश्चित आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.


















