पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांची विकेट पडल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दबाव झुगारुन लावत राठोड यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे भाजपच्या विरोधानंतर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला आहे.
राठोड आपला राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड यांनी केली होती. यावेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. यावेळी साधारण पाऊण तास या चौघांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी राठोड यांनी राजीनामा देतो पण तो स्वीकारला जाऊ नये, अशी विनंती केली होती.
मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा झाल्यानंतर पुन्हा राठोड यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. वर्षा बंगल्यावर जवळपास 1 तास चाललेल्या या बैठकीनंतर अखेर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
कोण आहेत संजय राठोड
संजय दुलीचंद राठोड हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत.
ते दिग्रस विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.
2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
2014 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांना महसूल विभाग देण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी देखील देण्यात आली .
2004 ते 2019 पर्यंत ते सलग निवडून आले आहेत.
आता ते वनमंत्री आहेत.
आमदार होण्यापूर्वी ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष होते.
30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.
राठोड हे बंजारा समाजातील आहेत.