सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदासाठी आपण इच्छुक नसल्याचं माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी सांगत या चर्चेतून माघार घेतली. त्यानंतर शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडामोडी घडल्या, आमदार विजयकुमार देशमुख हे लिंगायत समाजाचे नेते आहेत आणि बाजार समितीमध्ये सुद्धा लिंगायत समाजाचे मोठे वर्चस्व आहे त्यामुळे दिलीप माने यांच्या माघारनंतर आता सभापती कोणाला करायचे अशी चर्चा झाली असता लिंगायत समाजाचा चेहरा म्हणूनच माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील यांच्या नावावर जवळ-जवळ शिक्कामोर्तब आणि एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
इंदुमती आलगोंडा यांचे वडील भीमराव पाटील वडगबाळकर हे सभापती होते त्यांच्या वडीलानंतर इंदुमती अलगोंडा या त्यांच्या कन्या सभापती झाल्या. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती असताना दक्षिण तालुक्यातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. इंदुमती पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या अतिशय जवळच्या आहेत. बाजार समितीमध्ये कामगारांचे प्रश्न, अंतर्गत सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात इंदुमती आलगोंडा यांना यश आले होते. आमदार विजयकुमार देशमुख यांचे सभापती पदाचे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे ज्येष्ठ नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली त्यानंतर उपसभापती श्रीशेल नरोळे यांनी पण राजीनामा दिला. सभापतीपदासाठी विजयकुमार देशमुख यांच्या नंतर दिलीप माने यांचेच नाव आघाडीवर होते मात्र त्यांनी गुरुवारी रात्री अचानक या स्पर्धेतून माघार घेतली, त्यामुळे विजयकुमार देशमुख यांच्या नंतर दुसरा लिंगायत चेहरा म्हणून आता इंदुमती आलगोंडा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर असे दोन तालुके असल्याने इंदुमती पाटील सभापती झाल्यास सभापती दक्षिणचा आणि त्यानंतर उपसभापती हा उत्तर तालुक्यातील असणार हे नक्की आहे. त्यामुळे जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी, प्रकाश वानकर की विजया भोसले यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता मात्र लागून राहणार आहे.




















