वादग्रस्त एपीआय सचिन वाझे प्रकरणात अडचणीत आलेल्या महाविकास आघाडी सरकारची दुसरी विकेट पडली राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते, या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणावर अँड. जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या प्रकरणात सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार असल्याने महाविकास आघाडी सरकारवर नामुष्की ओढावली आहे.
यातच हायकोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजपाने पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी लागल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे, शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची सिल्व्हर ओक बैठक झाली, यात देशमुखांनी गृहमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल दिला. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला आहे.


















