सोलापूर : अब की बार किसान सरकार हे घोषवाक्य घेऊन निघालेली भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस हा पक्ष महाराष्ट्र राज्यात आपली संघटना वाढवीत असून विधानसभेच्या 288 जागा लढविणार आहे.
या पक्षातील शेतकरी आघाडीचे नेते माजी आमदार शंकर धोंडगे हे बुधवारी दिवसभर शासकिय विश्रामगृहात तळ ठोकून होते, सोलापुरातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेटी घेतल्या आहेत, यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस नेते, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचे बंधू माजी नगरसेवक रवि यलगुलवार, माजी आमदार दिलीप माने समर्थक माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांनी भेट घेऊन सत्कार केला.
भडकुंबे यांनी भेट घेऊन सत्कार करताना यावेळी कार्यकर्त्यांमधून आपणाला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार मिळाला असे वाक्य समोर आले. रवी यलगुलवार मात्र पत्रकारांना पाहून लगेच शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडले.
धोंडगे म्हणाले, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यात येथील राज्यकर्ते अपयशी ठरले आहेत. त्यांना जनता वैतागली आहे. येथील राज्यकर्त्यांना सक्षम पर्याय हवा आहे, तो पर्याय बी आर एस देईल. त्यामुळे बी आर एस पक्ष महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 विधानसभेच्या जागा लढविणार आहे आणि तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्राचा विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.




















