सोलापूर : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी अध्यक्ष दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह 10 जणांना जोरदार दणका बसला असून विभागीय उपनिबंधक (डेअरी) यांनी दहा जणांचे अपील फेटाळले आहे त्यामुळे यावेळी दिलीप माने यांना दूध संघात जाता येणार नाही. तर काका साठे यांचे दूध संघात एन्ट्री करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
सोलापूर जिल्हा दूध संघ संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज छाननीत माजी अध्यक्ष दिलीप माने, संचालक दिपक माळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्यासह 26 जणांचे अर्ज बाद झाले. या सर्वांना तीन दिवसात विभागीय उपनिबंधक डेअरी यांच्याकडे अपिल करण्याची मुदत होती. या 26 पैकी दहा जणांनी अपील केले आहे. जिल्हा दूध संघाला मागच्या तीन वर्षात नियमानुसार दूध पुरवठा केला नाही म्हणून हे अर्ज बाद ठरले होते, 26 पैकी दाजी दोलतडे, बळीराम साठे, दिलीप माने, दिपक माळी, सिद्धेश्वर आवताडे, संतोष वावर, सरस्वती भोसले, संताजी पाटील, तायप्पा गरंडे, संगीता लोंढे या दहा जणांनी 152 अ कलमानुसार विभागीय उपनिबंधक डेअरी यांच्याकडे अपील केले होते मात्र या दहाही जणांचे अपील विभागीय उपनिबंधकांनी फेटाळले, निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांचा निकाल कायम ठेवला अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली आता विभागीय उपनिबंधक यांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. दरम्यान शनिवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीत आता काय निर्णय होतो याची उत्सुकता लागून राहिली आहे.















