अवैध सावकारी प्रकरणी तक्रार आल्यानंतर बार्शी शहरातील येथील कापड बाजारातील श्री ज्वेलर्स या दुकानावर सहकार विभागाच्या पथकाने गुरुवारी धाड टाकली आणि तेथील दस्ताऐवज जप्त केले. तसेच या दुकानाचे मालक अशोक लंगोटे यांच्या तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथील घरावरही दुसर्या पथकाने धाड टाकून तेथील दस्ताऐवज जप्त केले.
या धाडीमध्ये सापडलेल्या दस्ताऐवजाची तपासणी परिवीक्षाधीन सहाय्यक निबंधक अमोल निरडे करीत आहेत. गणिता गव्हाळे यांनी अशोक लंगोटे यांच्या अवैध सावकारीप्रकरणी सहकार विभागाकडे तक्रार केली होती.
त्याच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी सचिन महाडीक यांनी आपल्या सहकार्यांसमवेत श्री ज्वेलर्समध्ये जावून तेथील रजिस्टर, कोरे चेक, कोर्या पावत्या आदी सावकारीविषयक कागदपत्रे जप्त केली.
तसेच सहकार अधिकारी मनिषा गुप्ता यांच्या पथकाने लंगोटे यांच्या घरी जावून तेथे असलेले कोरे चेक, खरेदी खते, नोंदवह्या आदी कागदपत्रे जप्त केली आहेत.

















