सोलापूर महानगरपालिकेतील माजी सभागृहनेते, ज्यांनी तीस वर्षे या शहराचे प्रतिनिधित्व केलं अशा सुरेश पाटील या ज्येष्ठ नगरसेवका विरुद्ध विशिष्ट नगरसेवकांनी एकत्र येत सभागृहात एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेत असताना, भाजपाच्या महापौरांनी सुरेश आण्णा पाटील सारख्या ज्येष्ठ नगरसेवकावर निलंबनाची कारवाई करावी हे अत्यंत दुर्दैवी वाटते. महानगरपालिकेच्या इतिहासात अतिक्रमण पाडण्याची घटना काही पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा अनेक ठिकाणी अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत. नुकतेच अक्कलकोट रोड कोंडा नगर येथे रस्ता रुंदीकरणाच्या वेळी अनेकांचे संसार उध्वस्त करण्यात आली आहेत, त्यामध्ये एका महिलेचा जीवही गेला होता. त्यावेळी मूग गिळून गप्प बसणारे हे नगरसेवक आत्ताच कसे काय एकवटले हा प्रश्न पडतो. अशा पद्धतीने विशिष्ट नगरसेवक एकत्र येऊन जर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर सुरेश आण्णा तुम्ही स्वतःला एकटे समजू नका शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिला. शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आज सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन मानाचा भगवा फेटा बांधून त्यांचा सत्कार केला त्यावेळी बरडे साहेब बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे व शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर आदी उपस्थित होते. बरडे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जर एखादा सदस्य अतिक्रमणे काढण्यास विरोध करत असेल तर, त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते हे माहित असताना देखील अतिक्रमण वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नगरसेवकांचा नेमका हेतू काय ? हेसुद्धा सोलापूरकरांना चांगले माहित आहे. आगामी काळात जनताच यांना धडा शिकवेल.