सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे दोन्ही नेतेमंडळी आपल्या वयाची 80 वर्ष पूर्ण केलेली. अजूनही या दोघांमध्ये पक्ष संघटनेसाठी काम करण्याची उमेद दिसून येते.
नुकतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बैठक घेतली. लोकसभा मतदासंघाचा आढावा घेतला. त्यात माढा लोकसभेवर चर्चा झाली त्या बैठकीला जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे उपस्थित नव्हते. तब्येत बरोबर नसल्याने काका हे त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत अशी माहिती समोर आली होती.
दरम्यान गुरुवारी काका साठे यांनी आपले नातू जयदीप साठे, मनोज साठे यांच्या सोबत बारामती याठिकाणी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती घेतली असता समजले की, तिथे कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विशेष म्हणजे यावेळी या दोन्ही ज्येष्ठांनी एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली, एकमेकांचे वय सुध्दा विचारले. तेव्हा पवार यांनी काका साठे यांना “बळीराम तुझ्यापेक्षा मी एक वर्षाने मोठा आहे, तब्येतीची काळजी घे” असे सांगितले. साहेबांच्या या शब्दाने काकांची ऊर्जा वाढल्याचे सांगण्यात आले.



















