कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा प्रचंड खर्च थांबवण्यासाठी व सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे.
यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. या निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना निर्देश देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सोलापूर जिल्हा हा शासनाने ब वर्गात समाविष्ट केलेला आहे, त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील वार्ड मधील नियमित विलगीकरण 3 हजार प्रति दिवस, व्हेंटिलेटर सह आयसीयू व विलगीकरण 6 हजार 700 रुपये प्रति दिवस तसेच केवळ आयसीयू व विलगीकरण 5 हजार 500 रुपये असे दर निश्चित झाले आहेत, यामध्ये कोविड चाचणी दर हा निश्चित केलेल्या दराप्रमाणे आहे, या निश्चित दरामध्ये आवश्यक देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधे, बेडस खर्च व जेवण यांचा समावेश आहे. दुसरी लाट येऊन गेली, अनेकांचा मृत्यू झाला, लाखो रुपये खर्च झाले, आता दर निश्चित करून फायदा काय, हे उशिरा सुचलेले शहाणपण नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
















