सोलापूर : तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर शासकीय विश्रामगृह येथे धनगर आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी अंगावर भंडारा उधळल्याचे प्रकरण ताजे असताना सोलापूर जिल्ह्यासाठी नव्याने आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत मात्र अंगावर शाई फेकीने झाले. पोलिसांनी अतिशय कडेकोट आणि मोठा बंदोबस्त ठेवला असतानाही अशी घटना घडली. त्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट झाले. वादग्रस्त असलेल्या कुणालाही त्यांनी पालकमंत्र्यांच्या जवळ जाऊ दिले नाही.
सोमवारी रात्री पालकमंत्री हे शासकीय विश्रामगृहात होते. साडेसातच्या सुमारास जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर भैय्या देशमुख हे विश्रामगृहावर आले. त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन द्यायचे होते तसेच त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी बुकेही मागवला होता. परंतु रविवारी रात्रीच्या घटनेने पोलिसांनी सतर्कता बाळगली. प्रभाकर देशमुख यांना पालकमंत्र्यांपासून लांब घेराटा घालून धरून ठेवले. शेवटी पोलिसांनी देशमुख यांना निवेदन देऊ दिले नाही. जेव्हा पालकमंत्री पाटील यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर पडला तेव्हा सुस्कारा टाकत पोलिसांच्या चेहऱ्यावर हसू दिसले.