सोलापूर : पोलीस भरतीत उंची वाढावी म्हणून केसाचा बनावट विग लावून पोलिसांना फसवणाऱ्या तरुण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील शेवते येथील प्रभुराम प्रकाश गुरव वय 31, असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
67 पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी आठ हजार 800 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्या उमेदवारांची शुक्रवारी शारीरिक मैदानी चाचणी सुरू झाली. त्यावेळी बनावटगिरी उघड झाली. प्रभुराम गुरव यांनी उंची वाढावी म्हणून केसांचा बनावट विग लावला होता. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलिस भरतीसाठी उमेदवाराची उंची किमान 165 सेंमी असावी, असा निकष आहे. शहर पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी उमेदवारांची उंची, छाती मोजण्याचा टप्पा पार पडला. त्याची जबाबदारी फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरठ यांच्याकडे होती. उंची मोजत असताना प्रभुराम गुरव याची उंची मोजली जात होती. त्याचे आजूबाजूचे केस कमी आणि मध्यभागीच उंच केस असल्याचे दिसून आले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बहिरठ यांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या केसात हात घातला. त्यावेळी त्याने घातलेला केसाचा विग उपसून निघाला. तत्पूर्वी, प्रभुराम गुरव या उमेदवाराची मूळ उंची 163.7 सेंमी होती. त्यामुळे त्याने ही तोतयागिरी केल्याची बाब उघड झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हणमंत बादोले हे करीत आहेत.


















