सोलापूर-बार्शी तालुक्यातील पाथरी या गावातील निवृत्त शिक्षक यांनी काबाडकष्ट करून मुलांच्या लग्न कार्यासाठी पै पै जमा करून दागिने घेतले होते.पण चोरट्यांनी 1 एप्रिल 2021 रोजी 23 तोळे दागिने आणि रोख रक्कम अशा मुद्देमालावर करून डल्ला मारला.गेल्या दहा महिन्यांपासून पाथरी येथील वृद्ध दाम्पत्य बार्शी पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्त हाक देत चोरीचा तपास लावा अशी मागणी करत आहेत.
आयुष्यभर राबराबून कमावलेल्या दागिने मिळवून द्या अशी विनंती केली आहे. पण गेल्या दहा महिन्यांपासून या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्जेराव वैजुनाथ पाटील(वय 72,रा पाथरी ता बार्शी,जि सोलापूर) हे आपल्या पत्नी सह उपोषणाला आले होते. पण पोलिसांनी उपोषण करायला त्यांना विरोध केला शेवटी त्यांची भेट पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना घालून दिली मात्र पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुन्हा आश्वासन देत परत पाठविले आहे.
सिंधू सर्जेराव पाटील या आपल्या पाथरी येथील राहत्या घरी कुलूप लावून एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. आणि सर्जेराव पाटील हे देखील कामानिमित्त बार्शी येथे गेले होते. बंद घर बघून चोरट्याने संधी साधली. भर दिवसा घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटमधील 23 तोळे वजनाचे दागिने आणि 15 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 8 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सर्जेराव पाटील हे घरी परतल्यावर त्यांना चोरीची घटना माहिती झाली आणि बार्शी पोलीस ठाण्यात 1 एप्रिल 2021 रोजीच फिर्याद दाखल केली होती. पण आजतागायत एवढ्या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात बार्शी पोलिसांना अपयश आले आहे.


















