सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अनेक रेड पडत आहेत, त्यामध्ये पोलीस प्रशासनातील कर्मचारी सुद्धा रंगेहात सापडले जात आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली असून याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवाहन केले असून या आवाहनाला पोलिस प्रशासनातील कर्मचारी प्रतिसाद देणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे, पोलीस आयुक्त बैजल यांनी काय आवाहन केले आहे पहा….👇👇👇👇
सोने असो नाहीतर दगड माती या जगात काहीही विकलं जातं. परंतु इमान, प्रामाणिकपणा, सत्शीलता हे गुण कधीच व कोठेच विकले जात नाही, या गुणांचा लिलाव करण्याइतकी शक्ती कोणातच नाही; कारण हे गुण तटस्थ व न्यायी असतात. ते स्वार्थापोटी कोणाच्या बाजूने झुकत नाहीत. कायद्यापुढे सर्व समान हेच आपले तत्व तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे आपले ब्रीद सांभाळत नुकतेच आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चिताकंदी यांनी एका बड्या नेत्याच्या कारला नंबर प्लेट नसल्याबद्दल कारवाई केल्याचे इनाम म्हणून आपण ₹5000/- चे पारितोषिक दिले. तसेच महादेव रासुरे या शेतक-याची शांती चौकात हरवलेली मोठी रक्कम परत केल्याबद्दल वाहतुक पोलीस परशुराम कंचनाळ यांचा प्रामाणिकपणाबद्दल ₹11001/- रोख पारितोषिक देऊन आयुक्तालयातर्फे गौरव केला आहे.
आपली खाकी वर्दी व तिच्यात असलेला सोनपिवळा रंग हे अशा तत्वनिष्ठ गुणांचे वैयक्तिक व राष्ट्राविषयी अभिमानाचे अस्सल सोनेच आहे. त्या रंगाला निळा, हिरवा, भगवा वा इतर कोणत्याही रंगाचा मुलामा चढायला नको. खाकी रंगातील वर्दीशी आपल्याला इमान राखायचे आहे..
इमान हुतात्मा होवू शकतो, परंतु भ्रष्ट होवू शकत नाही. हेच सोलापूर येथील चार हुतात्म्यांनी आपल्याला शिकवले आहे. सोलापूर येथील स्थानिक नागरिक आज आपल्या पोलीस खात्यात अधिकारी, ठाणे अंमलदार, पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कर्तव्य करताना पूर्व परिचित लोकांशी संबंध येवू शकतो. अशा वेळी सर्वच अधिकारी व अंमलदार यांनी तटस्थपणा व प्रामाणिकपणा जपणे ही सत्वशील इमानदारीची परीक्षाच असते. म्हणूनच आपणास आव्हान करण्यात येते की, आपण आपल्या पोलीस खात्यातील खाकी वर्दीतील तटस्थपणा व इमान जपावे, निःपक्षपाती रहावे. कोणत्याही राजकीय, जातीय अथवा समाजात अराजक माजविणा-या शक्तीपासून दूर राहून कर्तव्यनिष्ठा जपावी.

















