सोलापूर : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांना व डॉल्बी धारकांना सक्त ताकीद देताना यंदा डॉल्बीचा आवाज कमीच ठेवा अन्यथा मी गप्प राहणार नाही थेट गुन्हा दाखल करेन असा इशारा दिला.
गणेश उत्सव विसर्जन आणि ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय जिल्हा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
एस पी सरदेशपांडे म्हणाले, सोलापूर जिल्ह्याचा डी एन ए अतिशय शांतताप्रिय आहे. मुस्लिम समाज बांधवांना आवाहन केल्याप्रमाणे त्यांनी पोलिसांना प्रतिसाद देताना येथे मिलाची मिरवणूक 28 ऐवजी 29 तारखेला काढण्याचे एकमताने ठरवले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. गणेश उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारची काळजी घेतली आहे.आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात काही झाले नाही आणि यापुढेही होणार नाही म्हणून गाफील राहू नका, आम्ही सतर्क आहोत तुम्हीही सतर्क रहा असे आवाहन करताना यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज कमी ठेवा डॉल्बीचा जर गैरवापर होत असेल तर त्यांच्यावर दबाव आणा अन्यथा डॉल्बीधारक आणि मंडळाविरुद्ध आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशारा सरदेशपांडे यांनी दिला.