सोलापूर | एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे खुनाच्या आरोपातून विजापूर इथल्या तुरुंगातून सुटले त्यावेळी पक्षातीलच विरोधकांना धडकी भरली दुसरीकडे पैलवान समर्थकांच्या आनंदाला पारावार उरला नाही, पक्षाचे शहर आणि जिल्हाध्यक्ष पद हे फारुक शाब्दी यांना गेल्याने आता ते काय निर्णय घेणार? त्यांची भूमिका काय असणार? याकडे मुस्लिम समाजात लक्ष लागले होते. ते सोलापुरात आल्यानंतर त्यांनी काही दिवस शांत राहणे पसंत केले, काही दिवसांनंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.
यानंतर मात्र राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला, पैलवान आता एमआयएम सोडणार अशा चर्चेला उधाण आले, त्यानंतर मुंबई होऊन ते सोलापुरात आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी कारण विचारले त्यांना एमआयएम मध्येच राहण्याचा सल्ला दिला, महापालिकेचा गटनेता पद घेण्याचे सूचित केले मात्र त्यांनी साफ नकार दिला मी तुरुंगात असताना एमआयएमच्या कुणीही संपर्क साधला नाही, माझ्या जामीन साठी प्रयत्न केला नाही, मी सोलापुरात आल्यानंतर कोणीही भेटायला आले नाही किंवा साधा कॉल हि केला नाही, माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर सांत्वन सुद्धा केले नाही, पक्षात असताना कुणीही गोंधळ घातला तर थेट माझ्यावरच गुन्हा दाखल व्हायचा, कोणीही मदतीला येत नव्हते, मला कुटुंब नाही का? किती दिवस फरार व्हायचे, तुरुंगात जायचे आता बस झाले असे उत्तर आल्यानंतर हा विषय इथेच “स्टॉप” झाला.
त्यानंतर पैलवान राष्ट्रवादीच्या ज्यादा संपर्कात आले, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जादा सक्रिय होऊ लागलेत, आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्कात कायम असतात, राष्ट्रवादी प्रवेश याबाबत विचारले असता आम्ही कोणत्याही नेत्यासोबत वरिष्ठांकडे गेलो तरी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचे आहे असे असताना या गटबाजीचा त्रास का? असा सवाल पैलवान करत आहेत.
याच दरम्यान सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती परिसरात नाल्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या घरांवर महापालिकेने जेसीबी फिरवला, अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आली, हा विषय इतका पेटला की तोफिक शेख यांनी या विषयात ‘लीड’ घेऊन हा विषय हाताळला, सुरुवातीपासून शेवटपर्यंत या विषयाचा पाठपुरावा केला. मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना इथल्या नागरिकांनी थारा दिला नाही, महेश कोठे यांना घेऊन तोफीक शेख यांनी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यापर्यंत हा विषय लावून धरला, शेवटी पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना सूचना करून हा विषय मिटवा आणि नागरिकांना न्याय द्या अशा सूचना केल्या.
त्यानंतर पुन्हा महापालिकेत महापौर श्रीकांचना यंनम यांच्यासमोर बैठक घेऊन महापौर निधीमधून त्या नागरिकांना पुन्हा घरे बांधून देण्याचा निर्णय झाला. एकूणच या विषयात पैलवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडून परफेक्ट टायमिंग साधला आणि नागरिकांना न्याय मिळवून दिला, यावरून पैलवान राष्ट्रवादीमध्ये पूर्णवेळ सक्रिय झाल्याचं चित्र आहे आता केवळ त्यांचा प्रवेश नाममात्र बाकी असल्याचे दिसून येते. दुसरीकडे एमआयएम “पैलवान”वर पक्षांतर्गत कारवाई करण्याची ‘डेरिंग’ अजूनही करत नाही.


























