राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता होती, सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार असताना एकालाही मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही, शेवटी सोलापूरसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या दिलीप वळसे-पाटील या अभ्यासू आणि उत्तम प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले.
वळसे पाटलांनी तीन महिने चांगल्या पद्धतीने काम करताना जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली कोरोनाचा संसर्ग सुरू झाला त्यात वळसे-पाटील वयाने जास्त आणि ये-जा करणे शक्य नसल्याने सोलापुरातून पालकमंत्री बदला अशी मागणी जोर धरली. तसेच त्यांनी स्वतःहून पालकमंत्रीपद बदलण्याची विनंती केली. त्यानंतर पवारांच्याच जवळचे असलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली ते केवळ एक वेळेस सोलापूरला आले आणि त्यांच्यासह कुटुंब कोरोना पॉझिटिव झाले त्यानंतर पुन्हा पालकमंत्री बदलण्याची भाषा झाली
आणि शेवटी सोलापूर जिल्ह्याला लागून असलेले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे इंदापूरचे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या गळ्यात सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पडली मामा आपले गावरान स्टाईलचे तसेच सर्वांमध्ये मिसळणाऱ्या मामांनी पहिल्याच सोलापूरच्या भेटीत सर्वांना आपलेसे केले, वळसे पाटील, आव्हाड आणि भरणे मामा मध्ये बराच फरक आहे.
सोलापूरला दुसरा मामा मिळाल्याने सर्वजणच आनंदी होते कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भरणे मामा यांनी प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीचे काम करून घेतलं त्यानंतर कोरोनाच्या लाटेत ही जिल्ह्याची जबाबदारी पेलली, त्यांच्या कामाबाबत सोलापूरकर समाधानी आहेत. त्यांनी फिल्डवर काम केले , कोविड काळात सर्व हॉस्पिटलमध्ये गेले कोरोना पेशंटची संवाद साधला, अनेक रुग्णांना धीर दिला, निश्चितच हे कुठला पालकमंत्री करू शकला नसता,
ह्याच दरम्यान इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी घ्यायला मंजुरी मिळाली पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा मुद्दा प्रचारात आला सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला दिले जाणार असा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आल्यानंतर त्याला सोलापूरशहरासह जिल्ह्यातून तीव्र विरोध झाला सर्व पक्षासह राष्ट्रवादीच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असे असताना दत्तात्रय भरणे मामा यांनी खरे तर भीमा कालवा मंडळाचे सर्व अधिकारी आणि सर्व पक्षाचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्याशी बैठक घेऊन हा विषय समोर मांडायला हवा होता त्यासोबत माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा विषय संपवायला हवा होता
मात्र मामा हवेत गेले केवळ प्रेस नोटच्या माध्यमातून त्यांनी पत्र पाठवले, विरोध वाढत गेला, इंदापूरला पाच टीएमसी पाणी द्यायचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांनी रद्द केला इंदापूरला पाणी मिळण्यासाठी भरणे मामा यांच्यासह तालुक्यातील अनेकांनी लढा उभा केला असेल त्यांचे प्रयत्न होते मात्र योग्य पद्धतीने राजकीय व्यासपीठावर आणि माध्यमांसमोर मामांना हा विषय मांडता आला नाही त्यामुळे या प्रकरणात मामा बॅकफूटवर गेले त्यांनी पालकमंत्री पद सोडण्याची भाषा केली मात्र धनगर समाजामध्ये भरणे मामा हे चांगल्या प्रतिमेचे नेते असल्याने त्यांना पालक मंत्रिपदावर कायम ठेवण्यात आले. तेव्हापासून मामा काहीसे “अस्थिर” वाटतात. त्यांनी त्याचे सर्व खापर माध्यमांच्या माथी फोडलं आहे, राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला कोरोना लस कमी मिळते, पालकमंत्री म्हणून भरणे काय प्रयत्न करतात असे प्रश्न माध्यमे उपस्थित करतात, ते सुध्दा पालकमंत्र्यांना वाईट वाटते, माध्यमांनी प्रशासकीय कामांवर तसेच पालकमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करू नये का? सोलापूर दौऱ्यावर आले की ते प्रत्येक कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधीना लक्ष्य करत आहेत, विशेष म्हणजे शासकीय कार्यक्रमात. 15 ऑगस्ट रोजी तर ‘मामा’ ‘आनंदा’च्या भरात हवेत गेले, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले, त्याच्या बातम्या झाल्या, पण त्याचे ही खापर त्यांनी माध्यमांच्या माथी फोडले. त्या कार्यक्रमाला स्टेजवर वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी समोर 10 कॅमेरे, 100-150 लोक उपस्थित होते, अशावेळी एका जबाबदार मंत्री आणि पदाधिकाऱ्याच्या तोंडून असे शब्द येणे कितपत योग्य होते? त्याची बातमी तर होणारच, अजितदादा ही उजनी बद्दल असेच बोलता बोलता बोलून गेले होते की.
भरणे मामा सोलापूर दौऱ्यावर आले की गडबड-गडबड करतात, दौऱ्याचे नियोजन व्यवस्थित नसते, कार्यक्रमात सुरुवात मुद्देसूद होते नंतर गाडी कुठे घसरते त्यांनाच माहीत, मग हा पत्रकार दिसला की त्याचे नाव घ्यायचे, दुसरा दिसला की त्याचे, काय चाललंय राव? त्यांनी शासकीय कार्यक्रम शासकीय पद्धतीने करावा, माध्यम प्रतिनिधी सोबत अधिकारी विना स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी अशी अपेक्षा माध्यमांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांमधून व्यक्त होतेय.



















