मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोंडीत सापडले आहे अशातच राज्य सरकारने 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवत हा दिन ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले, या सोहळ्याला राष्ट्रगीत व महाराष्ट्र दिनाचे गीत गायन करून स्वराज्यगुढी उभी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, जिल्हा मुख्यालय येथे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करावा अशा सूचना करण्यात आल्या.
त्याप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.
सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हा परिषदेत हा कार्यक्रम झाला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत मंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेत राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मोठी ताकत आहे त्यामुळे सोलापूर जिल्हावर ही राष्ट्रवादीचा सर्वाधिक प्रभाव आहे असे असताना सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी शिवस्वराज्य दिनी दांडी मारली जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले नाहीत,
एकतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोलापूरकर प्रचंड नाराज आहेत, त्यांनी स्वतःहून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याची भाषा बोलून दाखवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता सर्व जिल्हा परिषदेत त्या त्या पालकमंत्र्यांनी हजेरी लावली, परंतु भरणे मामा आलेच नाहीत यावरून मराठा समाजात नाराजीचा सूर आहे, सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, मामा यायला हवे होते, समाजाची नाराजी घेणे योग्य नाही असे त्या नेत्याने प्रतिक्रिया दिली. सकल मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्री भरणे यांचा निषेध नोंदवण्यात आला, आता त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री पद सोडावे, ते या पदाला लायक नाहीत, पालकमंत्री भरणे मामा सपशेल फेल ठरले आहेत, कोरोना मध्ये इंजेक्शन पुरवठा, ऑक्सिजन, बेड कमतरता, कोरोना लस पुरवठा यात भरणे मामा यांच्यावर टीका झाली, उजनीच्या पाणी प्रश्नावर ते टार्गेट झाले आता पुन्हा शिवस्वराज्य दिनी दांडी मारून नवीन रोष ओढवून घेतला आहे.