सोलापूर : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या तयारीत असलेल्या राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसाठी तब्बल एक तास वेळ दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून समोर आलेल्या स्वच्छ व सुंदर शाळा या अभियानात काम केलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केलेली चार मिनिटाची स्वच्छ व सुंदर शाळा या विषयावर तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली मात्र अतिशय निकृष्ट दर्जाची ही चित्रफित तयार करण्यात आल्याचं चित्र पहायला मिळालं. व्यवस्थित आवाज नव्हता, डॉक्युमेंटरीचे एडिटिंग व्यवस्थित नव्हते या डॉक्युमेंटरीला दिलेला आवाज सुध्दा दमदार नव्हता यावरून ही डॉक्युमेंटरी अतिशय वाईट दर्जाची झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या समोर अशी निकृष्ट दर्जाचे डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली या चार मिनिटांमध्ये पंचवीस वेळा आवाज थांबला हे पाहून या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी डोक्याला हात लावला. ही डॉक्युमेंटरी सुरू असताना सभागृहातील सर्वांचे चेहरे पडले होते. या वरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आजच्या चांगल्या आणि देखण्या कार्यक्रमात स्वतःचा पचका करून घेतला.

















