सोलापूर ! जिल्हा परिषद सदस्य, मोहोळ तालुक्याचे नेते बाळराजे पाटील हे सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये आले होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या केबिनमध्ये बसले होते, त्यांच्यासोबत बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, सरपंच भाऊ लामकाने, मनोज साठे यांची उपस्थिती होती, दरम्यान काही पत्रकार तिथे होते, त्यांनी बाळराजे यांना विचारले, तुम्ही विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत म्हणून चर्चा आहे, तेव्हा त्यांनी कोण म्हणाले मी इच्छुक आहे, नाही ओ, मग शांत का? असा प्रश्न पुन्हा पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी “निष्ठावंत सध्या शांत आहेत” असे सांगून ते गप्प झाले.
याचवेळी जितेंद्र साठे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी किती जण साहेबांसोबत होते?फक्त काका आणि राजन मालक हेच ना? साधी सभा घ्यायला कुणी तयार नव्हते, आम्ही घेतली सभा, सभेला यायची सुध्दा डेरिंग कुणाची झाली नाही, आम्ही यशस्वी केली सभा. आणि तिथून साहेबांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले ते यशस्वी झाले, राज्यात सत्ता आली, सत्ता येईपर्यंत निष्ठावंत, नंतर आमचे काम संपले असा सूर उपस्थित सर्वांमधून निघाला.
काका साठे हे आमदार व्हावेत म्हणून काका सोडून इतर कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत मात्र यश मिळत नाही. दुसरीकडे राजन पाटील यांचे नाव चर्चेत येते पण नंतर विषय पुढे सरकत नाही. येत्या डिसेंबर महिन्यात विधान परिषद निवडणूक आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून बाळराजे पाटील हे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. परन्तु, त्यांनी आपण इच्छुक नसल्याचे सांगून या चर्चेला तूर्त पूर्ण विराम दिलाय.



















